साधना

Your Spiritual Journey

शिवस्तुती Shivastuti

Shivastuti is a beautiful hymn praising Lord Shiva, the moon-crowned one, the destroyer of sorrows, and the compassionate ocean of mercy. He is the remover of obstacles, the embodiment of detachment, and the auspicious Lord of the universe. Lord Shiva is the embodiment of various divine qualities and virtues. He is adorned with the crescent moon, wears a serpent as a crown, and is the compassionate remover of sorrows. He is the auspicious Lord of the universe and the destroyer of obstacles.

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥

रवींदुदानावल पूर्ण भाळीं ।
स्वतेज नेत्रीं तिमीरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥

जटा विभूती उटि चंदनाची ।
कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥

वैराग्य योगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥

उदारमेरु पति शैलजेचा ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥

ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ ।
भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरी दोष महविदारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥

कपूरगौरी गिरीजा विराजे ।
हळाहळें कंठ निळाच साजे ।
दारिद्र्य दुःख स्मरणें निवारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥

स्मशानक्रीडा करिता सुखावे ।
तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा ।
तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥

नंदी हराचा हर नंदिकेश ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥

भयानक भीम विक्राळ नग्न ।
लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥११॥

इच्छा हराची जग हे विशाळ ।
पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥

भागीरथीतीर सदा पवित्र ।
जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या ।
पदारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥

कीर्ती हराची स्तुती बोलवेना ।
कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥

सर्वांतरी व्यापक जो नियंता ।
तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरुपधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥

सदा तपस्वी असे कामधेनु ।
सदा सतेज शतकोटी भानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥

कर्पूरगौर स्मरल्या विसावा ।
चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहितसुचना विचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥

विरामकाळी विकळे शरीर ।
उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनि चित्तहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥

सुखावसानीं सकळें सुखाची ।
दुःखावसानी टळती जगाचीं ।
देहावसानी धरणी थरारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥

अनुहतशब्द गगनी न माय ।
तिचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥

शांतिस्वलीला वदनीं विलासे ।
ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥

पीतांबरें मंडित नाभि ज्याची ।
शोभा जडीत वरि किंकिणींची ।
श्रीवेददत्त दुरितान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥

जिवाशिवांची जडली समाधी ।
विटला प्रपंचीं तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जती वेद चारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥

निदान कुंभ भरला अभंग ।
पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥

मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।
माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥

जाई जुई चंपक पुष्पजाती ।
शोभे गळा मालतिमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे ।
संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥

नागेशनामा सकळां जिव्हाळा ।
मना जप रे शिवयंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यानगुहा विहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥

एकान्ति ये रे गुरुराजस्वामी ।
चैतन्यरुपी शिव सूखनामी ।
शिणलों दयाळा बहुसाळ भारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥

शास्त्राभ्यास नको व्रतें मख नका तीव्रें तपें ती नको ।
काळाचें भय मानसीं धरु नको दुष्टांस शंकू नका ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥३१॥

Source: https://web.bookstruck.in/book/chapter/6714 ↗

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *