Monday, September 25, 2023
HomeGodsहिंदू महाकाव्य 'महाभारत' मधील कुरु राज्याचा राजनेता भीष्म पितामह यांच्या पुण्यतिथीनिमित्त

हिंदू महाकाव्य ‘महाभारत’ मधील कुरु राज्याचा राजनेता भीष्म पितामह यांच्या पुण्यतिथीनिमित्त

देवव्रत, अर्थात भीष्म, हा महाभारत या संस्कृत महाकाव्यात उल्लेखलेला कुरुवंशीय राजपुत्र होता. हस्तिनापुराचा कुरुवंशीय राजा शंतनू व गंगा यांचा हा पुत्र होता. शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच पुत्राला हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून याने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणी होण्याचा वर दिला होता. महाभारतीय युद्धात याने सेनापती म्हणून कौरवपक्षाच्या सैन्याचे नेतृत्व केले. सशस्त्र पुरुषाशिवाय अन्य कुणाविरुद्ध शस्त्र न धरण्याची याची नीती ठाऊक असल्याने अर्जुनाने शिखंडीस पुढे घालून युद्धात याच्यावर शरवर्षाव केला. बाणांनी घायाळ झालेल्या अवस्थेत याने प्राण रोखून धरले व ५८ दिवसांनी दक्षिणायन संपल्यावर रणांगणावर प्राणत्याग केला.

सोमवंशातील राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष. ब्रह्मदेवाच्या शापाने गंगा शंतनूची पत्‍नी बनली आणि वासिष्ठांचा शाप व इंद्राची आज्ञा यांमुळे अष्टवसू हे गंगेचे पुत्र बनले. तिने पहिले सात पुत्र मारल्यानंतर शंतनूच्या विनंतीवरून आठव्या पुत्राला जीवदान दिले. हा आठवा पुत्र म्हणजेच भीष्म होत. एका मतानुसार ते अष्टवसूंचा सारभूत अवतार होते, तर दुसऱ्या मतानुसार ते अष्टवसूंपैकी ‘द्यु’ या आठव्या वसूचा मानवी अवतार होते.

त्यांचे मूळचे नाव देवव्रत असे होते. परंतु आपल्या वडिलांचे जिच्यावर मन बसले आहे, त्या सत्यवतीनामक धीवरकन्येचा त्यांच्याशी विवाह व्हावा आणि त्यासाठी तिच्या वडिलांनी घातलेल्या ‘तिच्या पुत्राला राज्य मिळावे’ याा अटीनुसार त्यांनी आमरण ब्रह्मचर्याची शपथ घेतली. या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना ‘भीषण’ या अर्थाचे ‘भीष्म’ हे नाव कायमचे प्राप्त झाले. त्यांच्या या प्रतिज्ञेमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना इच्छामरणी होण्याचा वर दिला. गंगेचा मुलगा असल्यामुळे त्यांनी गांगेय व नदीज अशी नावे मिळाली, तर शंतनूचा मुलगा असल्यामुळे शांतनव असे नाव मिळाले. ते महाभारत युद्धाच्या वेळी कुरुवंशातील सर्वांत वृद्ध पुरुष असल्यामुळे त्यांना कुरुवृद्ध असे म्हटले जाई तसेच त्यांचा निर्देश ‘पितामह’, ‘भीष्माचार्य’ इ. आदरार्थी शब्दांनी केला जात असे.”
लहानपणी गंगेजवळ असताना वसिष्ठांनी त्यांना सर्व वेद शिकविले होते. त्यांनी बृहस्पती व शुक्राचार्य यांच्याकडून शस्त्रास्त्रांचे, परशुरामाकडून शस्त्रास्त्रांबरोबरच राजधर्म व अर्थशास्त्र यांचे, च्यवनभार्गवाकडून सांगवेदांचे व मार्कंडेयांकडून यतिधर्माचे ज्ञान मिळविल्याच्या कथा आढळतात. यांतील काही कथा त्यांचे सर्वज्ञत्व दर्शविण्यासाठी रचल्या असण्याची शक्यता आहे. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्म, नीती, दर्शने इ. क्षेत्रांतील त्यांच्या अलौकिक ज्ञानामुळे त्यांना सर्वशास्त्रवेत्ता मानले जाई. महाभारतयुद्धामध्ये शरशय्येवर पडल्यानंतर त्यांनी युधिष्ठिराला (धर्मराजाला) केलेला उपदेश महाभारताच्या अनुशासन आणि शांतिपर्वांत विस्ताराने आला आहे. परंतु इतकी विद्वत्ता असूनही ते दुःशासनाने केलेली द्रौपदीची विटंबना थांबवू शकले नाहीत, हा त्यांच्या जीवनावरील कलंक असल्याचे काही अभ्यासक मानतात तसेच कौरवांचे दोष दिसत असूनही महाभारत युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, युद्धाच्या वेळी आपल्या पराभवाचा मार्ग पांडवांना सांगणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कुल नष्ट होत असतानाही प्रतिज्ञेला चिकटून राहणे इ. प्रकारचे दोष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याची टीकाही अनेकजण करतात.

कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. शंतनूसाठी ते आमरण ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर चित्रांगद व विचित्रवीर्य या सावत्र भावांचेही ते संरक्षक बनले. विचित्रवीर्यासाठी पत्‍नी म्हणून अंबिका व अंबालिका यांना त्यांनीच जिंकून आणले. धृतराष्ट्र, पांडू व विदुर यांचे पालनपोषण, शिक्षण व विवाह त्यांनी केले. कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्थाही त्यांनी केली. अशा रीतीने त्यांनी कुरुवंशातील चार पिढ्यांची काळजी वाहिली.

त्यांच्यावर युद्धाचे अनेक प्रसंग आले. शंतनूच्या मृत्यूनंतर शेजारच्या उग्रायुध राजाने सत्यवतीच्या अभिलाषेने त्यांच्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी तीन दिवस लढून त्याला ठार मारले. काशिराजाने अंबा, अंबिका व अंबालिका या आपल्या मुलींसाठी स्वयंवर घोषित केले, तेव्हा त्यांनी जमलेल्या राजांचा पराभव करून विचित्रवीर्यासाठी त्या मुली जिंकून आणल्या. अंबेच्या सांगण्यावरून परशुरामाने भीष्मांना तिच्याशी लग्‍न करावयास सांगितले; परंतु त्यांनी ते नाकारल्यामुळे परशुरामाने त्यांच्याशी युद्ध केले. तेवीस दिवस चाललेल्या या युद्धात भीष्मांनी परशुरामाचा पराभव केला; परंतु परशुरामाच्या काळाचा विचार करता ही घटना अनैतिहासिक असावी, असे मानले जाते. महाभारतयुद्धात पहिले दहा दिवस ते कौरवांचे सेनापती होते. या काळात त्यांनी बराच पराक्रम केला. एकदा तर ⇨अर्जुनाला त्यांनी मृर्च्छित केल्यामुळे ⇨कृष्णाने हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा मोडली. त्यांच्या रथाच्या ध्वजावर तालवृक्षाचे चिन्ह होते.
स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करावयाचे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते चिकटून राहिले. ही प्रतिज्ञाही त्यांनी स्वतःहूनच स्वीकारली होती. अंबेशी विवाह करण्याची आज्ञा प्रत्यक्ष परशुरामाने देऊनही त्यांनी ती नाकारली. विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर स्वतः सत्यवतीने आपल्या विधवा सुनांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांना नियोगाची आज्ञा दिली; परंतु तीही त्यांनी मानली नाही. शंतनूने सत्यवतीशी लग्‍न होण्यापूर्वी त्यांना युवराज म्हणून अभिषेक केला होता. परंतु प्रत्यक्षात त्यांनी राज्याचा लोभ कधीच केला नाही. अखेरपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी राजा बनवून ते अधिकारपदापासून दूर राहिले.

महाभारत युद्धाच्या दहाव्या दिवशी अर्जुनाने शिखंडीच्या आडून त्यांच्यावर बाण मारले. भीष्मवधासाठी तपश्चर्येने पुनर्जन्म प्राप्त केलेली अंबा हीच शिखंडी असल्याचे सांगितले जाते. भीष्म शिखंडीला स्त्री मानत असल्यामुळे त्यांनी शिखंडीआडून आलेल्या बाणांचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे ते जखमी होऊन खाली कोसळले. पौष कृष्ण सप्तमीला फाल्गुनी नक्षत्रावर ही घटना घडली, असे मानले जाते; परंतु त्यावेळी दक्षिणायन चालू होते. भीष्म इच्छामरणी असल्यामुळे उत्तरायण चालू होईपर्यंत प्राण न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्जुनाने त्यांना शरशय्या करून दिली. माघ शुद्ध अष्टमीला विनशन नावाच्या क्षेत्रात त्यांनी प्राण सोडले. चित्रावशास्त्रींच्या मते मृत्युसमयी त्यांचे वय १८६ इतके असावे. इरावती कर्वे यांच्या मते त्यावेळी त्यांचे वय कमीत कमी ९० ते १०१ वर्षांचे असावे. माघ शुद्ध अष्टमी ही ‘भीष्माष्टमी’ मानली जाते. ज्यांचे पितर जिवंत आहेत, त्यांनीदेखील त्या दिवशी भीष्मासाठी तर्पण करण्याची प्रथा आढळते. भीष्म ब्रह्मचारी असल्याने अशी प्रथा पडली. गुजरातमध्ये भीष्माष्टमीला भीष्मप्रतिमेची पूजा करतात. माघ शुद्ध द्वादशीला ‘भीष्मद्वादशी’ म्हटले जाते. उत्तर भारतात ‘भीष्मपूजा’ नावाचे एक व्रत केले जाते तसेच कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस ‘भीष्मपंचक’ नावाचे एक काम्यव्रतही केले जाते. कुरुक्षेत्राच्या परिसरात ‘भीष्मशरशय्या’ या नावाचे एक तीर्थक्षेत्हीर आढळते.

भीष्मप्रतिज्ञा

देवव्रत हा हस्तिनापुराचा राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र होता. देवव्रताच्या जन्मानंतर पुढील काळात शंतनूचा धीवरकुळातील सत्यवतीवर जीव जडला. मात्र सत्यवतीचा पिता दाश याने शंतनूला सत्यवतीशी लग्न करायचे असल्यास शंतनूनंतर सत्यवतीच्या वंशजांकडेच राज्याधिकार देण्यात यावेत, असे वचन मागितले. शंतनूची विवाहाची इच्छा साकारण्यासाठी देवव्रताने ज्येष्ठ पुत्र असूनही हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची भीष्म म्हणजे कठोर प्रतिज्ञा केली. या प्रतिज्ञेमुळे देवव्रताचे भीष्म असे नामाभिधान झाले.

अंबा-शाल्व प्रकरण व शिखंडीचा जन्म

पुढे सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य याच्या विवाहासाठी भीष्माने अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवरातून हरण केले. तिघींपैकी अंबेचे प्रेम सौभपती(?) शाल्व याच्यावर असल्याचे कळल्यावर भीष्माने तिला शाल्वाकडे धाडले. परंतु शाल्वाने तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून जाऊन अंबेने परशुरामाला भीष्माला युद्धाचे आमंत्रण देण्याची विनंती केली. व जोपर्यंत अंबेचे समाधान होत नाही, तोपर्यंत युद्ध करावे लागेल ही अट घातली. हा वाद खूप विकोपास गेल्यावर गंगेच्या मध्यस्थीने भगवान शिवास यात हस्तक्षेप करावा लागला. आणि महादेवाने अंबेला असे वरदान दिले की जेव्हा भीष्माला वृद्धाअवस्था ग्रासेल तेव्हा तुझा पुनर्जन्म होईल. अंबेने आत्महत्या केली व नंतर शिखंडी म्हणून पुनर्जन्म घेतला. भीष्माला युद्धात हरवण्यासाठी शिखंडी कारणीभूत झाला, अशी कथा महाभारतात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

C G Suprasanna on Vijayraghav Mandir, Ayodhya
Peddinti Devaraju on Nilavanti : The book of Mysteries
Premswarup yadav on Nilavanti : The book of Mysteries
P.chandrasekaran on Hindu temples in Switzerland
Muhamad on Soma
Muhamad on Soma
muhamadsofyansanusi28@gmail.com on Soma
Pankajkumar Shinde on Nilavanti : The book of Mysteries
Ashwath shah on Mahabharat- Story or Truth
Shubhra lokhandr on Nilavanti : The book of Mysteries
Aditya Sharma on Mahabharat- Story or Truth
Aditya Sharma on Mahabharat- Story or Truth
prachi chhagan patil on Nilavanti : The book of Mysteries
Prateek the vedantist on Shivleelamrut 11 Adhyay
Prateek the vedantist on Shivleelamrut 11 Adhyay
Voluma on Brihaspati
Vinayak anil lohar on Sirsangi Kalika Temple
Skip to toolbar