इच्छापूर्ती शाबरी मंत्रांच्या एक लाखांहून अधिक ओव्या नाथांनी आणि त्यांच्या शिष्यांनी रचल्या आहेत. हे कुठेही लिखीत स्वरूपातील साहित्य नाही. गुरूशिष्य परंपरेतून दिले जाणारे हे मंत्र स्वयंसिद्ध आहेत. हे मंत्र अतिशय प्रभावी आहेत. ह्या मंत्रांचा प्रभाव तत्काळ बघता येतो. बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांत सांगितले जाणारे शाबरी मंत्र हे मुळ शाबरी मंत्र नाहीत. बाजारातील पुस्तकांत जे मंत्र दिले जातात ते वास्तविक बर्भरी मंत्र आहेत. मुळ शाबरी मंत्राची बिजं या मंत्रामध्ये रोवून बर्भरी मंत्र बनवले गेले असावेत.
श्रीमद भागवत गीतेत सांगितल्याप्रमाणे नवनाथ हे वृषभ देवांच्या शंभर रूपांपैकी नऊ नारायण म्हणून प्रसिद्ध होते. या नऊ मुलांनी जगताच्या उद्धाराची जबाबदारी आपल्या खांद्यांवर पेलली होती. नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मच्छिन्द्रनाथ होते. जसे विष्णू अवतारातील मत्सवतार हा प्रथम अवतार होता तसाच हा मत्स्येन्द्रवतार आहे. श्री नवनाथ कथासार हा ग्रंथ दृष्टांत स्वरूपात लिहिला गेला आहे. या कथासारामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंनी मस्त्याच्या पोटी अवतार घेतला होता म्हणून त्या अवताराला “श्री मत्स्येंद्र ” असे नामकरण झाले होते. परंतु त्याचा प्राकृत मराठीत उच्चर करत असताना किंवा बोली भाषेत तेच नाव ” श्री मच्छिंद्र” असे झाले. हे मच्छिन्द्रनाथ नाथपंथाचे जनक ठरले. ते प्रथम नाथाचार्य ठरले.