साधना

Your Spiritual Journey

भूतकथा – Bhootkatha

भुते आहेत  कि नाहीत या चर्चेपेक्षा भूत आहे असे आपण का समजतो यात मला जास्त रस आहे.भुताची कल्पना फार प्राचीन काळापासून आहे .महाभारत काळातही भुतांचे उल्लेख आढळतात .ज्याची इच्छा राहते त्याचे मेल्यानंतर भूत होते अशी समज आहे .

मी स्वतः कोकणातील आहे . दीर्घकाळ कोकणात खेडेगावात वास्तव्य केले आहे.भुताच्या अनेक कथा मी ऐकल्या आहेत परंतु मला स्वतःला कधी अनुभव आलेला नाही.यावा अशी इच्छाही नाही .ज्याप्रमाणे रात्री आपण चालताना आपल्याच पावलांच्या आवाजाने दचकतो त्याचप्रमाणे ज्याचा कार्यकारणभाव लागत नाही अशा गोष्टी अापण भुताने केल्या असे समजत असू .पिकल्याशिवाय विकत नाही अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे भुताच्या गोष्टींमध्येही काहीतरी तथ्य असावे असे म्हणता येईल .भुतांच्या शंभर तथाकथित गोष्टींमध्ये एखादी तरी खरी असावी असे म्हणता येईल .

कोकणात १४ प्रकाराची भूते प्रसिद्ध आहेत.

१) वेताळ: हे भूत सर्वात ताकदवान असते सर्व भुतांचा राजा असे जरी म्हटले तरी चालेल.सर्व भुतांवर याचा अंमल चालतो.

२) ब्रम्हराक्षस: व्युत्पन्न ब्राह्मणाच्या भुताला ब्रह्मराक्षस म्हणतात .हे साधारणपणे वडाच्या झाडावर असते .

३) समंध:  हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर जुनाट झाड किंवा तिठ्ठा अशा ठिकाणी असते. कोकणात हे सर्वात ताकदवान भूत मानले जाते. जिथे कौल घेतला दिला जातो तिथेही याच्याविरुद्ध काही करता येत नाही.अर्थात वेताळ याच्यावर असतो .

४) देवचार: हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्ना नंतर थोड्याच दिवसात मरतो त्याचे हे भूत असते. ही भुते गावाच्या चारी बाजूला असतात अशी समजूत आहे  .कोकणात यांना डावे अंग म्हटले जाते. कोकणी माणसांच्या गाऱ्हाण्यात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. याची सहानुभूती मिळविण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर, खोबरे द्यावे लागते.तसे केले नाही तर ते त्रास देते अशी समजूत आहे

५) मुंजा: जो ब्राह्मण  मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो  त्याचे  हे भूत असते. याचे मुख्य स्थान  पिंपळाच्या झाडावर किंवा विहिरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.

६) खवीस: हे भूत मुसलमानाचे असते ज्याचा खून झाला आहे त्याचे हे भूत असते .हे फार त्रासदायक भूत असते.

७) गिऱ्हा: जो माणूस बुडून मेला किव्वा ज्याचा खून झाला त्याचे हे भूत असते. हे भूत पाण्याच्या आसर्‍याला राहते. हे फार त्रासदायक असे भूत असत. रात्रीच्या प्रहरात जर कोणी नदी किव्वा  खाडी पार करताना याच्या तावडीत सापडला तर ते त्याला खोल ठिकाणी घेऊन जाते. कोकणात रात्रीच्या वेळी जे कुर्ले, मुळे पकडायला जातात त्यांना हमखास या भुतांचा अनुभव येतो. कोकणात असे सांगितले जाते की जो कोणी या भुताचा केस मिळवू शकेल तर हे भूत त्याचा गुलाम बनते. त्याला हवे ते आणून देते. पण तो केस त्याला(भुताला) पुन्हा मिळाला तर तो त्या माणसावर सर्व तर्‍हेची संकटे आणतो.खरे खोटे अर्थातच माहीत नाही पण अशी समज आहे .

८) चेटकीण: हे मागासवर्गीयांचे भूत असते. याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

९ ) झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भुतांमध्ये गणले जाते.

१०) वीर: हे भूत क्षत्रिय समाजाच्या व्यक्तिचे असते.याला निमा असेही म्हटले जाते.

११) लावसट: ओली बाळन्तिण( बाळंत झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसात )मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्युनंतर लावसट मध्ये होते.

१२) खुन्या: हे अतिशय क्रूर असे भूत असते. हे हरिजन समाजातील भूत असते.

१३) बायंगी(वायंगी): हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी, लांजा, गोळवशी किंवा मालवण चौक येथे सुमारे दहा हजार रुपयांना हे विकत मिळते. हे भूत मालकाची भरभराट करते आणि शत्रूला त्रास देते.

१४) चकवा(भुलीचे झाड) हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्‍या लोकांचा रस्ता चुकविते. सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही.(चकवा बहुधा घाटावरचे भूत असावे कोकणात याला भुलीचे  झाड असे म्हणतात .व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेली चकवा या नावाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे  मीही भुलीचे झाड म्हणून एक गोष्ट लिहिली आहे .माणसे रात्रीची माळरानावर वाट चुकतात याची अनेक कारणे असू शकतील .)

भुतासंबंधी आणखी एक समज प्रचलित आहे .ज्याप्रमाणे शासनामध्ये एक सत्तेची उतरंड असते त्याप्रमाणेच भुतांमध्येही वरिष्ठ कनिष्ठ असे प्रकार असतात .वरिष्ठ पातळीवरील भुतांकडून कनिष्ठ पातळीवरील भुते नियंत्रित केली जातात .कोकणातील देव देवस्की चे व्यसन (कुठेही खुट्ट झाले एखादी शिंक आली किंवा पाऊस पाणी कमी जास्त झाले तर हे भुताने केले असे समजणारे व त्यासाठी देवळात जाउन उपाय करणारे)असलेले लोक आपल्या कामांसाठी निरनिराळ्या गावातील देवळांमध्ये चढत्या भाजणीने जाऊन आपली कामे करून घेतात असे पाहिलेले आहे .कामे होतात की नाही ते माहीत नाही .

मनुष्य त्यांच्यामध्ये असलेले गरीब श्रीमंत कनिष्ठ वरिष्ठ नियंत्रित करणारा नियंत्रित केला जाणारा इत्यादी प्रकार भूत निर्मिती देव निर्मिती यांमध्ये प्रतिबिंबित करीत असतो ,असे दिसून  येते असे म्हटले तर चूक होणार नाही .

या भुतांमध्ये आणखी एक प्रकार कोकणात किंवा घाटावरही कदाचित आढळून येतो. त्याला महापुरुष असे संबोधिले जाते. आपल्याच वंशातील कुणीतरी व्यक्ती मृत्यूनंतर आपल्या वंशातील लोकांचे संरक्षण करीत असते अशी समजूत आहे .ती कोणालाही त्रास देत नाही परंतु व्यक्ती व वतन यांचे संरक्षण करीत असते, अशी समजूत आहे.जर कुटुंबातील व्यक्तीला महापुरुषाच्या कार्यक्षेत्रामध्ये त्रास दिला तर तो त्या व्यक्तीचे संरक्षण करतो . हा महापुरुष कल्पनेतूनच निघालेला असावा असे वाटते .ज्याप्रमाणे परमेश्वर(ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे  सामर्थ्यशाली तत्व )आपले संरक्षण करतो असे आपण म्हणतो त्याप्रमाणे हा छोटा परमेश्वर .ज्याप्रमाणे आपण परमेश्वरावर भार टाकून मोकळे होतो त्याचप्रमाणे या महापुरुषावर भार टाकून लोक मोकळे होताना आढळून येतात .काहींना असेहि वाटते की ते आदितत्त्व तुमच्या प्रापंचिक व वैयक्तिक गोष्टींमध्ये कशाला काही ढवळाढवळ करील ?.आपल्या सारखेच परंतु प्रचंड विस्तारित असे ते आदितत्त्व म्हणजे परमेश्वर आहे अशी आपण कल्पना करून सर्व  आराखडा रचित असतो .

भुते कोकणातच असतात असा घाटावरच्या लोकांचा जरी समज असला तरी ते बरोबर  आहे असे मला वाटत नाही .कोकणातील माणसे भुते आहेत असे काही वेळा विनोदाने घाटावरचे लोक म्हणताना आढळतात. जिथे माणसे आहेत तिथे भुते आहेत असे म्हणता येईल. ज्याप्रमाणे असतील शिते तर जमतील भुते अशी म्हण आहे त्याप्रमाणेच जिथे जिथे माणसे तिथे तिथे भुते असे म्हणता येईल.

काही काही वेळा माणसे भुतासारखे वर्तन करताना आढळून येतात .त्यांची (भुतांची व माणसांची)नावे व प्रकार निरनिराळे असतील .

मुळात भूत आहे की नाही हा वादाचा विषय होऊ शकतो .जशा अनंत योनी आहेत त्यामध्ये एक भूतयोनि असू शकते.यदा कदाचित भूत असले तरी ते वाटेल त्याला त्रास देईल असे मला वाटत नाही .ज्यांचा त्यांच्याशी पूर्व जन्मीचा (पुनर्जन्म आहे असे गृहीत धरून )काही संबंध असेल त्यालाच ते भूत त्रास देईल असे  मला वाटते .माणसे जशी चांगल्या वाईट प्रवृत्तीची असतात त्याप्रमाणेच भुते असलीच तर  चांगल्या वाईट प्रवृत्तीची असतील.वाईट प्रवृत्तीचा माणूसहि जसा वाटेल त्याच्या वाटेला जात नाही त्याप्रमाणेच भुतांचे असावे .प्रत्येक माणूस जसा वाईट नसतो तसेच प्रत्येक भूत वाईट नसणार .माणसे जशी त्रास देतात तशी भुतेही त्रास देणार. माणसे जशी चांगली वागतात तसेच भुते ही चांगले वागणार.जसे माणसांना भिऊन वागावे लागते त्याप्रमाणेच भुतानाही भिऊन वागावे लागत असणार !!(कदाचित भूत ही आपलीच निर्मिती आहे.)

जीवनात काही ना काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात .त्यांचा कार्यकारण भाव जर समजू शकला नाही तर मनुष्य साधारणपणे ती गोष्ट देव भूत दैव अशा काही न समजणार्‍या  गोष्टींवर ढकलून मोकळा होतो.अशाप्रकारे कार्यकारणभाव प्रस्थापित करतो .कार्यकारण भाव न समजण्याचे कारण अज्ञान असते त्याचप्रमाणे  घडणार्‍या  प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असलाच पाहिजे अशी  आपली दृढ समज असते. भीतीपोटी मनुष्य अनेक गोष्टी करतो ज्याप्रमाणे तो भुतांवर विश्वास ठेवतो त्याचप्रमाणे तो देवावरही विश्वास ठेवीत असणार . काही लोक देवळात काहीतरी मागण्यासाठी ,किंवा आपले वाईट होऊ नये भरभराट व्हावी चांगले व्हावे यासाठी जातात दानधर्म करतात. देवळात गुरवाकडे जाऊन भुताचा बंदोबस्त करणारा मनुष्य व देवळांमध्ये किंवा प्रत्येक धर्माच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन किंवा पीर समाधी अशा ठिकाणी जाऊन नवस बोलणारा मनुष्य यामध्ये मूलभूत काही फारसा फरक आहे असे वाटत नाही.असलाच तर फरक असा असेल की देव वाईट करतो असे बहुधा  वाटत नसावे .निरनिराळ्या देशातील प्रांतातील धर्मातील निरनिराळ्या थरातील लोक काय समजतात माहित नाही. प्रसिद्ध तत्त्वज्ञ कार्लाईल यांचे एक वाक्य अजरामर आहे तो म्हणतो “मला एखाद्या समाजाचे देव सांगा आणि मी तुम्हाला ती माणसे कोणत्या प्रकारची व कशी आहेत ते सांगेन”

सुशिक्षित असो अशिक्षित असो गरीब असो श्रीमंत असो मनुष्याची मूलभूत प्रवृत्ती समान आहे. अापण सुरक्षित असावे आपण संपन्न असावे आपण सतत असावे या इच्छेमधून सर्व गोष्टी निर्माण होतात असे मला वाटते.काही मागण्याच्या इच्छेने जरी व्यक्ती देवळात गेली नाही तरी जेव्हा ती नमस्कार करते तेव्हा  अंतर्यामी आपले व आपल्या कुटुंबियांचे किंवा समाजाचे धर्माचे चांगले व्हावे अशी इच्छा मनात कुठेतरी निश्चित असणार असे मला वाटते .प्रत्येक मनुष्याने आपल्या मनाशी विचार करून पाहावा .सुप्त किंवा प्रगट काहीही इच्छा कुठेही तिळभरही नसताना देवळात जाऊन नमस्कार करणारी व्यक्ती  असेलहि परंतु ती अपवादात्मक असेल असे मला वाटते .

मुळात भुताला लाच देणारा व जाब विचारणारा मनुष्य आणि आपापल्या देवस्थानांमध्ये जाऊन देवाला नमस्कार करणारा दान देणारा आणि प्रार्थना करणारा मनुष्य यांमध्ये मूलभूत फरक आहे असे वाटत नाही. काही जणांना हे न रुचण्याचा संभव आहे.मी भूत व देव यांना एका पातळीवर आणित नसून  दोन प्रकारच्या माणसांना समान प्रवृत्तीचे म्हणत आहे .  दोन प्रकारच्या माणसामधील साम्य दाखवीत आहे.

मुळात मी वर म्हटल्याप्रमाणे मंगल असावे मंगल व्हावे सतत असावे या मूलभूत इच्छेचे हे सर्व अविष्कार आहेत .लिहावे तेवढे थोडेच असा हा विषय आहे .इति.

Author: Prabhakar Patvardhan. Read full book here.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *